भारत पवार : मुख्य संपादक : बातम्या , जाहिराती व महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती साठी इच्छुकांनी संपर्क करावा .मो.९१५८४१७१३१. देवळा : ता.३० : गेल्या सव्वा वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून जवळपास पंधरा हजार गरजू रुग्णांवर सव्वाशे कोटी रु.ची मदत दिली गेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सहाय्यता निधीच्या निकषात बदल करत महागड्या इलाज असणाऱ्या आजारांचाही आता यात समावेश करण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले. शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने रविवार (ता.२९) रोजी देवळा येथील अनाथ व निराधार मुलांना मदतनिधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य हितेंद्र आहेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री.चिवटे श्रोत्यांशी संवाद साधतांना पुढे म्हणाले कि, अनाथ मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले कायम सहकार्य असेन. या मुलांना उज्वल भविष्य देण्यासाठी आपण आपला वाटा उचलायला हवा. प्रत्येकाने अशा कार्याला बळ द्यायला हवे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.डी.के.आहेर यांनी केले. यावेळी २९ अनाथ व निराधार मुलांना धनादेश व शालेय साहित्याचे तर ११ निराधार महिलांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू विषद करतांना अनाथ व निराधार मुलांचे वास्तव चित्र उभे केले.
यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे यांना शिवनिश्चल पुरस्कार, शिंदेशाही पगडी व मानपत्र देत सन्मानित करण्यात आले. येथील आमदार डॉ.राहुल आहेर, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी आपल्या मनोगतातून या मदतनिधी उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की, कोरोनाकाळात प्रत्येकाला आधार देत माणसांत देव शोधला याचे समाधान वाटते. तर आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, सज्जन शक्ती एकत्र झाली तर इतिहास घडवला जाऊ शकतो म्हणून चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत नवा समाज घडवूया.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शिवशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी शाहिरी गीते व पोवाडे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. मशाल प्रज्वलित करत व मदतनिधी वितरणाची चित्रफित दाखवत कार्यक्रमाची सुरुवात झाली. यादरम्यान शासनाच्या आरोग्यदूत मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, कळवण एज्युकेशन सोसायटीचे सरचिटणीस भूषण पगार, उमराणे बाजार समितीचे राजेंद्र देवरे, देमको बँकेच्या चेअरमन कोमल कोठावदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले शासकीय ठेकेदार रमेश शिरसाठ यांनी पन्नास हजार रुपयांची मदत या अनाथ व निराधार मुलांसाठी सुपूर्द केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गोसावी व भगवान आहेर यांनी केले तर ऋषीकेश गोसावी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महिलावर्गासह येथील व राज्यभरातील शिवनिश्चलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवनिश्चल कोअर कमिटीचे भगवान आहेर, डॉ.सुनील आहेर, पंकज जाधव, अनिल भामरे व इतर स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
विशेष : गेल्या दहा वर्षांपासून हा अनाथ निराधार मुलांना मदतनिधी उपक्रम चालू आहे. आतापर्यंत आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त तसेच इतर आपत्तीग्रस्त अशा अनेक कुटुंबांना व त्यातील अनाथ मुलांना शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने मदत झाली आहे. तसेच ता संस्थेने या अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले आहे. आगामी काळात अशा मुलांसाठी मोठे काम उभे करण्यात येईल असे यशवंत गोसावी यांनी सांगितले.
कार्यक्रमास सुमारे चार हजार श्रोत्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी केदा आहेर , प्राचार्य हितेंद्र आहेर , भाऊसाहेब पगार , राजेंद्र देवरे , शिवव्याख्याते यशवंत गोसावी आदींनी मार्गदर्शन केले.