वासोळ: क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज – पारंपरिक पिकांच्या लागवडीत नेहमीच घाटे का सौदा होत असल्याने पपई बागेची लागवड केली होती. पपई चांगली देखील आली होती. परंतु कोरोनामुळे पडलेल्या टाळेबंदीत पपईची विक्री अडकली तर वातावरणातील बदलामुळे पपईवर झालेल्या विषाणु हल्ल्यामुळे पपई बागेवर नांगर फिरविण्याची वेळ देवळा तालुक्यातील वासोळ येथील रामा सुर्यवंशी या शेतकऱ्यावर ओढावली असून केलेला खर्च देखील निघाला नसल्याने आता या शेतकऱ्यास मदतीची अपेक्षा आहे.
मागील वर्षी धरण भरल्यामुळे आणि पारंपरिक पिकांचे वातावरणातील बदलामुळे होत असलेला परिणाम यामुळे देवळा तालुक्यातील वासोळ येथील शेतकरी रामा सुर्यवंशी यांनी पपई बागेची जानेवारी महिन्यात पाच बाय सात अंतरावर नाशिक येथून तेरा रूपये प्रतिरोप असे एक हजार पपई रोप आणून ठिबकवर लागवड केली होती.
बागेला वेळोवळी फवारण्या, खत, पाणी मिळत असल्याने बाग बहरात होती. या बागेला जवळपास एक लाख रूपयांपर्यंत या शेतकऱ्याने खर्च केला होता. त्यामुळे शेतकऱ्यास जवळपास चार ते पाच लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु पपईवर विषाणुच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे झाडांचे पूर्णतः पाने गळुन पडली. सूर्यप्रकाश फळावर पडल्याने फळे सडली तर कोरोनाच्या टाळेबंदीमुळे पपईला बाजारपेठ मिळाली नाही. व्यापारी येऊन गेले परंतु खरेदीसाठी धजावले नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्याने या पपई बागेवर नांगर फिरविला आहे. दरम्यान आता या शेतकऱ्यास मात्र तात्काळ मदतीची गरज आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप, रब्बी हंगामात दरवर्षीच नुकसान होते म्हणुन पपई लागवड केली होती. परंतु या पपईवर देखील झालेल्या विषाणू हल्ल्यामुळे ना विक्री झाली ना अपेक्षाप्रमाणे उत्पन्न मिळाले. नाईलाजास्तव पपईवर नांगर फिरवावा लागला.